राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील ज्वारीचे जिल्हावार :

जिल्हा खरीप रबी

अकोला २,७१९ --
अमरावती १,९०५ --
अहमदनगर ९ ५,८८०
उस्मानाबाद २,५६९ १,९५६
औरंगाबाद ८१८ ३,१६०
कोल्हापूर ५५० २५
चंद्रपूर ३५३ १,७८५
जळगाव १,३७५ २०९
धुळे ५१५ ६७६
नांदेड २,७०९ ३९०
नागपूर १,५७९ ५४७
नासिक ६४ ३३३
परभणी १,९७७ २,०२७
पुणे १७४ ४,०९३
बीड ९०६ २,२७१
बुलढाणा २,९३८ २७
भंडारा १७ ५३२
यवतमाळ २,८५६ ---
वर्धा १,३०९ ९
सांगली ८३० १,०१७
सातारा ८३० १,२२४
सोलापूर ७ ७,९९८




महाराष्ट्र २७,४७९ ३३,९७९
भारत १,०६,५३० ६३,१२०




हवामान : विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. आफ्रिका, आशिया, उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण हवामानात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या पिकाला साधारणतः २७° ते ३२° से. तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८° ते ४४° से. तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६° से. पर्यंत किमान तापमान चालते. सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते. ३० ते ४५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार ज्वारीचे पीक घेतात. यापेक्षा कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ओलीताखाली ज्वारीचे पीक घेतात.

जमीन : ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत व pH मूल्य ५·५ असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते.

फेरपालट : ज्वारीच्या पिकाच्या बाबत पिकांच्या फेरपालटीची आवश्यकता असते. त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते. फेरपालटीमुळे जमिनीच्या एकाच पातळीतील वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही. मुळे खोलवर जाणाऱ्या पिकानंतर ज्याची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, असे पीक त्याच जमिनीत लावल्यास दोन्ही पिके चांगली येतात. कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण वाढून नंतरचे त्याच शेतातील ज्वारीचे पीक चांगले येते. उत्तर भारतात बार्ली, गहू अगर भात व वाटाण्यानंतर ज्वारी पेरतात. मध्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात. बागायती ज्वारीची फेरपालट मिरची, तंबाखू, भुईमूग वगैरे पिकांबरोबर करतात.

मिश्रपीक : ज्वारीचे पीक मिश्रपीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्रपीक घेतात.

मशागत : या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०–१२ सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.

हंगाम आणि पेरणी पद्धती : एकूण हंगाम तीन असतात. पावसाळी (खरीप), हिवाळी (रबी) व उन्हाळी. पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. खरीप व रबी पिके दाणे आणि वैरणीसाठी लावतात. उन्हाळी पिके ओल्या वैरणीसाठी लावतात. पीक लावण्याचे जिरायत (कोरडवाहू) व बागायत (ओलीताखालचे पीक) असे दोन प्रकार आहेत. जिरायत पिकाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

(१) स्थानिक रुढ पद्धत : जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात.

(२) दुर्जल शेती पद्धत : यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात.

(३) टोकण पद्धत : जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५ x ४५ सेंमी. अंतरावर सरळ ओळीत ५-६सेंमी. खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६–८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. खरीप पिकात दोन ओळींमधील अंतर ३०–४५ सेंमी. आणि रबी (कोरडवाहू आणि बागायती) पिकांच्या बाबतीत ते ४५ सेंमी. ठेवतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्‌भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी तसेच वेगवेगळ्या जमिनींस व हवामानांस अनुकूल असे ज्वारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९–१० किग्रॅ. आणि वैरणीच्या पिकासाठी ५०–६० किग्रॅ. बी पेरतात.

आंतर मशागत : पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) सु. तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३–४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात. दुष्काळी अगर कमी पावसाच्या विभागात अकोला कोळप्यासारख्या कोळप्याने कोळपणी करतात.

खत : वार्षिक ७५ ते ८२ सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात. निरनिराळ्या प्रयोगांवरून असे आढळून आले आहे की, हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. पेक्षा जास्त नायट्रोजन आणि २०–३० किग्रॅ. पेक्षा फॉस्फोरिक अम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारांच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमाणात वाढ होत नाही. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते. निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरित प्रकारांसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगान्ती ठरविण्यात आल्या आहेत. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी कृत्रिम खतांतील घटकांचे हेक्टरी प्रमाण कोष्टक क्र. ३ मध्ये दिल्याप्रमाणे शिफारस करण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 4425 +22